बँकांचा तीन दिवसांचा संप स्थगित

मुंबई : वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेला ११ ते १३ मार्च असा तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक चर्चा केल्याने संप तूर्त स्थगित केल्याची घोषणा ऑल इंडिया बँक एम्प्लाइज असोसिएशनने शनिवारी केली. यामुळे होळी उत्सवात बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे होणारी ग्राहकांची गैरसोय टळणार आहे.


आज मुंबईत बंक कमर्चाऱ्यांच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधी आणि इंडियन बँक असोसिएशनचे प्रमुख राजकिरण राय यांच्यात चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांबाबत इंडियन बँक असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ११ मार्चपासूनच तीन दिवसांचा प्रस्तावित संप स्थगित केल्याचे इंडियन बँक असोसिएशननेचे महासचिव सी. एच वेंकटचेलम यांनी म्हटलं आहे.


जानेवारी अखेरच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय संपानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात तीन दिवसीय संपाची हाक दिली होती. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने २१ ते १३ मार्च असा तीन दिवस संप करण्याची घोषणा केली होती. त्याआधी मंगळवारी १० मार्च रोजी होळीची सुट्टी आहे. आठवडाअखेर दुसरा शनिवार आणि रविवार आल्याने सलग सहा दिवस बँका बंद राहण्याची शक्यता होती. ज्यामुळे ऐन होळीच्या सणासुदीत ग्राहकांना मनःस्ताप सहन करावा लागला असता. यापूर्वी ८ जानेवारीच्या भारत बंदमध्ये बँक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कमर्चाऱ्यांनी संप केला होता. मात्र त्याला केंद्र सरकारने फारसा प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा एकदा कर्मचारी संघटनांनी ११ ते १३ मार्च असा तीन दिवस संप करण्याची तयारी केली होती.