ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती


ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी पदभार स्वीकारला.


ठाणे : ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदी विजय सिंघल यांची नियुक्ती झाली असून आज महापालिका भवन येथे त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.


विजय सिंघल हे 1997 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी आयआयटी रुड़की येथून बी.ई. (सिव्हिल)मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तर आयआयटी दिल्ली येथून बिल्डिंग सायन्स अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये एमटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून लोक सेवा धोरण व व्यवस्थापन या विषयात एम.एससीचे शिक्षण पूर्ण केले आहे.


 श्री. सिंघल यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी, मलकापूर, बुलढाणा,  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद, हिंगोली जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, कोल्हापूर महापालिका आयुक्त, साखर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, उद्योग आयुक्त आणि बृहन्मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे.


जळगाव जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी राबविलेल्या नदी जोडणी प्रकल्पासाठी तत्कालीन  पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे हस्ते त्यांना “सार्वजनिक क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशासनासाठी पंतप्रधान पुरस्कार"देण्यात आला आहे.


राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वैयक्तिकरित्या सादर केलेल्या या प्रकल्पाचे माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी देखील कौतुक केले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "भारतातील सर्वात स्वच्छ राज्याची राजधानी" या विभागात मुंबई शहराला  स्वच्छ, सुंदर बनविल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


साखर आयुक्त कार्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल सुवर्णपदक तसेच विविध डिजिटल उपक्रम राबवून संपूर्ण यंत्रणा ऑनलाईन सुरू केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना रौप्यपदक देवून गौरवण्यात आले आहे.


ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथे आयोजित “आंतरराष्ट्रीय नदी परिषदेत जळगाव जिल्ह्यातील नदी-जोडणी ” प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.


मुंबई महापालिकेमध्ये राबविलेल्या विविध डिजिटल उपक्रमांसाठी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते त्यांना "राष्ट्रीय डिजिटल ई-शासन पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. यासह सामाजिक व प्रशासकीय कार्यात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेवून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महापालिकेत कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्केपर्यत शिथील करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या आस्थापना वगळून इतर सर्व खाजगी आस्थापना तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.


कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने कासारवडवली येथे निर्माण केलेल्या 40 खाटांच्या अलगीकरण कक्षासह दाखल होणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध आवश्यक सोयीसुविधाचाही त्यांनी आढावा घेतला. 


महापालिका क्षेत्रात ‛कोरोना' व्हायरसचा संसर्ग वाढू नये तसेच तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागासह सर्व विभागास दिले. यावेळी कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असणारे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.