लवळे खून प्रकरणातील मुख्य आरोपीला 'स्थानिक गुन्हे शाखे'कडून अटक


पुणे– वर्चस्ववादातून ऐन दसऱ्याच्या दिवशी झालेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला सहा महिन्यानंतर पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांची चाहूल लागताच लवळे येथील डोंगरात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.


महेश बाळासाहेब गावडे (वय ३१, रा. लवळे, ता. मुळशी जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रतीक सातव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पौड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर २०१९ रोजी ऐन दसऱ्याच्या दिवशी प्रतीक सातव याचा टोळी वर्चस्ववाद आणि पूर्ववैमनस्यातून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. मागील सहा महिन्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते.


सोमवारी (दि. ६) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपी महेश गावडे लवळे मधील सिम्बाॅयसिस कॉलेज येथील मुख्य इमारतीजवळील डयुटी रुम जवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी कॉलेजजवळ असलेल्या डोंगरात पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली.


ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, साहाय्यक फौजदार दत्ता जगताप, पोलीस कर्मचारी रौफ इनामदार, लियाकत मुजावर, सुधीर अहिवळे, बाळासाहेब खडके यांच्या पथकाने केली आहे.