दीपांकर दत्ता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ; राज्यपाल कोश्यारी यांनी दिली  शपथ


मुंबई – कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी न्यायाधीश दीपांकर दत्ता यांना पदाची शपथ दिली.


मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचा कार्यकाळ २७ एप्रिल रोजी संपला. या पार्श्वभूमीवर न्या. दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


मुंबई येथे फिजिकल डिस्टन्स पाळत पार पडलेल्या शपथविधीच्या या छोटेखानी समारंभासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, न्या. दत्ता यांचे कुटुंबीय, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.


न्यायाधीश दीपांकर दत्ता यांचा अल्प परिचय


दिनांक ९ फेब्रुवारी १९६५ रोजी जन्मलेल्या न्या. दीपांकर दत्ता यांनी दिनांक १६ नोव्हेंबर १९८९ रोजी वकिलीला सुरुवात केली. त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, झारखंड उच्च न्यायालय तसेच काही वेळा सर्वोच्च न्यायालयात एकूण १६ वर्षे सेवा बजावताना दिवाणी, घटनात्मक, कामगार, सेवा, शिक्षण व वाहतूक विषयक प्रकरणे हाताळली. घटनात्मक वाद आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. दिनांक २२ जून २००६ रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये त्यांची कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.