संचारबंदीत केश कर्तनालय सुरू ठेवणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल


मावळ – पुणे जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू केले असताना एका दुकानदाराने आपले केश कर्तनालय सुरू ठेवून दुकानात लोकांची गर्दी केली. ही घटना मंगळवारी (दि.७) संध्याकाळी ८च्या सुमारास मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडली. याबाबत पोलिसांनी दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.


गणेश ज्ञानदेव ढमाले (वय ३४, रा. दारुंब्रे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई समाधान लक्ष्मण फडतरे यांनी शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने संचारबंदीचे आदेश दिले आहेत.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करून आरोपीने त्याचे सार्थक हेअर सलुन हे दुकान सुरू ठेवले. दुकानात लोकांची गर्दी करून कटिंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.


पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता आरोपीने मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.