मजूर, विस्तापित व बेघरांना निवारागृह, अन्न-पाणी, वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकास्तरिय नियंत्रण समिती - आयुक्त


ठाणे : कोरोना कोव्हीड -19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॅाकडाऊनमुळे बंद झालेल्या उद्याग व्यवसायातील प्रभावित झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्तींना आवश्यकतेनुसार निवारागृह, अन्न, पाणी व वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (2) यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकास्तरिय नियंत्रण समिती गठीत करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.  


या नियंत्रण समितीमध्ये मुख्य व वित्त लेखाधिकारी, उप आयुक्त(शिक्षण) आणि नगर अभियंता आदींचा समावेश असून या समितीला महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती निहाय कम्युनिटी किचन तयार करून त्याच्या संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.


कम्युनिटी किचनमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दैनंदिन अन्न शिजवून मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा करण्यासाठी ही समिती काम करणार आहे.


दरम्यान शहरामध्ये सद्यस्थितीत अनेक ठिकाणी राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड, खासदार डॅा. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे व शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विस्थापितांना, मजुरांना भोजन पुरवठा करण्यात येतो.


त्याशिवाय रूस्तमजी बिल्डर्स, लायन्स क्लब, ठाणे सिटीझन्स ॲार्गनायझेशन, हॅाटेल असो. ठाणे, आसिफ रोटरी क्लब, ठाणे, युनायटेड सिंघ सभा फाऊंडेशन, अक्षयपात्र, महिंद्र जिटीओ, समर्थ भारत व्यासपीठ, महेश्वरी मंडळ, साईनाथ सेवा महिला मंडळ, समन्वय युवा प्रतिष्ठान, लक्ष्मी कॅटरर्स, सोहम झुनका भाकर केंद्र, संघर्ष ग्रुप आदी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जवळपास 47 हजार गरजू, विस्थापित आणि बेघर व्यक्तींना अन्न-पाणी पुरविण्यात येते. या सर्व स्वयंसेवी संस्थाना कम्युनिटी किचन म्हणून घोषित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


शिजविलेले अन्न मागणीप्रमाणे शासनाकडून प्राप्त होणाऱ्या यादीप्रमाणे वितरित करणे तसेच प्रभागातील गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविणे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उप विभागीय अधिकारी, ठाणे अविनाश शिंदे यांची नियुक्ती केली असून महापालिकेच्या वतीने पालिकेच्या 9 प्रभाग समितीचे उप अभियंता यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून सर्व सहाय्यक आयुक्त यांच्यावर देखरेख व नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्व नोडल अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी यांनी उप विभागीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार कम्युनिटी किचन सुरू करून गरजूंना अन्न पुरवठ्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.