कोव्हीडचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेची रूग्णालयांसाठी नियमावली


ठाणे : कोव्हीड-19 सदृष्य लक्षणे असलेल्या रूग्णांपासून नॅान कोव्हीड रूग्णांना कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी ठाणे शहरामधील विविध रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण कक्षामध्ये कोणत्याही रूग्णांची तपासणी करण्या आधी त्या रूग्णाला कोरोना सदृष्य काही लक्षणे आहेत काय याची तपासणी केल्यानंतरच बाह्य रूग्ण कक्षामध्ये त्यांची तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर कोव्हीड आणि नॅान कोव्हीड ओपीडी वेगवेगळ्या असाव्यात अशा प्रकारची नियमावली ठाणे महानगरपालिकेने शहरातील सर्व रूग्णालयासाठी तयार केली ती नियमावली आज सर्व रूग्णालयांना निर्गमित करण्यात आली.


सद्यःस्थितीमध्ये महापालिकेच्यावतीने कोव्हीड सदृष्य रूग्णांची तपासणी करण्यासाठी शहरामध्ये महापालिकेची आरोग्य केंद्रे आणि काही खासगी हॅास्पीटल्समध्ये ताप बाह्य रूग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त काही खासगी किंवा सरकारी रूग्णालयांतील नॅान कोव्हीड ओपीडीमध्ये तापाची लक्षणे असलेले रूग्ण उपचारासाठी येत असतात. या बाह्य रूग्ण विभागामध्ये काम करणाऱ्या डॅाक्टर्स, नर्सेस किंवा इतर कर्मचाऱ्यांनी पीपीई किटस् वापरले नसल्यास त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्याचबरोबर त्या बाह्य रूग्ण विभागामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या नॅान कोव्हीड रूग्णांनाही त्याचा संसंर्ग होण्याची शक्यता गृहित धरून नॅान कोव्हीड ओपीडी मध्ये येणाऱ्या रूग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र ट्रायज एरिया तयार करून त्या ठिकणी त्याची प्राथमिक तपासणी करावी. त्याला ताप, सर्दी, कोरडा खोकला इत्यादीकोव्हीड सदृष्य लक्षणे आहेत का याची तपासणी करावी व त्यानंतरच त्याला नॅान कोव्हीड बाह्य रूग्ण कक्षामध्ये तपासण्यात यावे.


अशा व्यक्तीस जर कोव्हीड सदृष् लक्षणे आढळल्यास त्यास तात्काळ जवळच्या ताप बाह्य रूग्ण विभागामध्ये तापासणीसाठी पाठविण्यात यावे अशा सूचना ठाणे महानगरपालिकेने निर्गमित केल्या आहेत.


त्याचबरोबर बाह्य रूग्ण विभागामध्ये जे वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत त्यांनी पीपीई किट वापरणे बंधनकारक असून कोव्हीड ओपीडी आणि नॅान कोव्हीड ओपीडी पूर्णतः वेगवेगळी असायला हवी. जेणेकरून नॅान कोव्हीड ओपीडी मधील रूग्णांना कोव्हीड ओपीडीमध्ये येणाऱ्या रूग्णांकडून संसर्ग होणार नाही.


सदरची नियमावली आज महापालिकेच्यावतीने शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयांना निर्गमित करण्यात आली असून संबंधित रूग्णालय व्यवस्थापनाने कोव्हीडचा संसर्ग रोखण्यासाठी या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे असे आदेश महापालिकेच्यावतीने देण्यात आले आहेत.