काळसेकर रुग्णालय  कोवीड १९ पॉझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून घोषित


ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना कोव्हीड 19 चा वाढता संसर्ग लक्षात घेवून कोव्हीड १९ बाधित रुग्णांना उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सोयी उपलब्ध होणेसाठी तसेच जे रुग्ण स्वतः खर्च करून उपचार घेवू शकतात त्यांच्यासाठी आता मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालय हे  कोवीड १९ पॉझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून घोषित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.


महाराष्ट्रामध्ये कोरोना कोव्हीड - १९ चा प्रसार मोठया प्रमाणात होत असल्याने व दैनंदिन कोरोना कोव्हीड 19ची  लागण बऱ्याच नागरिकांना झाल्याचे वेळोवळी निदर्शनास येत असल्याने कोरोना कोव्हीड १९ बाधित नागरिकांना तातडीने इतर समाजातील नागरिकांपासून आयसोलेट करणे, उपचारासाठी  रुग्णालयमध्ये स्वतंत्र विभागात दाखल करणे,  रुग्णाच्या सर्व तपासण्या करणे, तसेच वेळोवेळी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे इत्यादी कारणासाठी कोव्हीड - १९ कोरोना रुग्णालय म्हणून घोषीत करणे आवश्यक आहे.


त्या पार्श्वभूमीवर काळसेकर रुग्णालयातील अत्याधुनिक सुखसुविधांचा विचार करता, कोरोना कोव्हीड - १९ साथरोग बाधित रुग्ण  किमान ७० ते ८० रुग्ण या रुग्णालयात दाखल करुन सोशल डिस्टसिंग ठेवून उपचार करणे शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कोव्हीड 19  रुग्णांना उपचार करणेसाठी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय ( २७८ खाटा ) व होरॉयझन रुग्णालय (५० खाटा) कौशल्या हॅास्पीटल आणि वेदांत रुग्णालय कोव्हीड १९ रूग्णालये म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आलेली आहेत . या  व्यतिरिक्त बेथनी रुग्णालय (५० खाटा) हे कोमाॅरबीड (comorbid) कोरोना संशयित रुग्ण दाखल करणे व उपचार करणे यासाठी घोषित करण्यात आलेले आहे. परंतु कोरोना कोव्हीड 19 चा वाढता संसर्ग टाळण्यासाठी तसेच बाधित रुग्णांना तात्काळ उपचार देता यावेत यासाठी आता काळसेकर रुग्णालय इमारत, त्या इमारतीमधील आरोग्य सुखसुविधा, इतर सुखसुविधा, रुग्णालयामध्ये कार्यरत वैद्यकिय तज्ञ, परिचारीका, प्रसाविका, पॅरामेडीकल स्टाफ, सफाई कर्मचारी इ. सर्व रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे वैद्यकिय पथक, रुग्णांना आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सुविधा, अति दक्षता विभाग, व्हेंटिलेटर  आदी  सर्व सुविधांसह काळसेकर रुग्णालय साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोवीड १९ पॉझिटिव्ह सिमटोमंटिक रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि . १३ मार्च २०२० पासून लागू करण्याची अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर कायद्यातील तरतूदीनुसार कोरोना कोव्हीड - १९ साथरोग बाधित रुग्णांच्या उपचारासाठी काळसेकर रुग्णालय, कौसा, मुंब्रा हे कोरोना कोवीड - १९ पाॅझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापुढे सदर रुग्णालयामध्ये फक्त कोरोना कोव्हीड - १९  बाधित रूग्ण ज्यांना रुग्णालयीन उपाचारांची गरज आहे असेच रुग्ण सदर रूग्णालयात दाखल करण्यात येणार असून अशा रुग्णांवर उपचार करणे हॉस्पिटल प्रशासनावर बंधनकारक राहणार आहे.


कोणत्याही परिस्थितीत कोवीड आणि नॉन - कोवीड रुग्णांचे मिक्सिग करण्यात येऊ नये. तसेच संशयित आणि कोवीड कन्फर्म पॉझिटिव्ह रुग्णांचे सुध्दा मिक्सिग करण्यात येऊ नये असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.