रेल्वे कामगार वाहतूक करताना फिजिकल डिस्टन्सिंगकडे होतंय दुर्लक्ष


लोनावळा –  रेल्वे लाईन दुरुस्ती  व इतर दुरुस्ती कामाकरिता कामगार दोन डब्यांमधून घेऊन जाताना रेल्वे प्रशासनाकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.


लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, युवा मोर्चाचे हर्षल होगले यांनी रेल्वेचे एरिया प्रमुख ध्रुवकुमार देवांशी व स्टेशन मास्तर देशपांडे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर चुकीची कबुली देत उद्यापासून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल तसेच लोणावळा भागातील कामगार कल्याण, कर्जत भागात पाठविले जाणार नाही, कामगारांची आरोग्य तपासणी केली जाईल तसेच पुणे पिंपरी चिंचवड भागातून कोणाला कामाला येऊ दिले जाणार नाही याची खबरदारी घेऊ असे देवांशी यांनी सांगितले. देवांशी म्हणाले रेल्वे कामगार वाहतूक करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकरिता एक जादा डब्बा उपलब्ध व्हावा अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.


मागील काही दिवसांपासून रेल्वेने ट्रॅक तसेच लाईन दुरुस्तीचे काम, घाट परिसरातील बोल्टिंगचे काम सुरु केले आहे. याकरिता लोणावळा भागातून कामगार दोन डब्यांमधून नेहले जातात. काही कामगार ठाकूरवाडी, मंकीहिल भागात तर काही कल्याण, बदलापूर, कर्जत पळसदरी येथे नेले जातात तसेच कल्याण भागातून देखील कामगार कामासाठी आणले जात असल्याची तक्रारी आल्यानंतर चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, रामविलास खंडेलवाल यांनी रेल्वेचे स्टेशन मास्तर व पोलीस अधिकारी यांची भेट घेतली.


या प्रश्नाबाबत स्टेशन मास्तरांना निवेदन दिले होते. त्यानंतर देखिल परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली. आज रेल्वे कामगारांनी पुन्हा ही बाब नगराध्यक्षा जाधव यांना सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा मोजक्या शिष्टमंडळासह जाऊन रेल्वेचे लोणावळा विभाग प्रमुख ध्रुवकुमार देवांशी यांची भेट घेतली. यावेळी सर्व कामगारांनी आमची कसलीही वैद्यकिय तपासणी केली जात नसल्याचे तसेच रेल्वे डब्यातून कोंबून कामाच्या ठिकाणी घेऊन जात असल्याचे सांगितले. सुमारे शंभर कामगार, रेल्वे कामगार संघटन‍ांचे प्रमुख हे देखील यावेळी उपस्थित होते.