विस्थापित/ बेरोजगार नागरिकांच्या मदतीसाठी  सामाजिक संस्थांनी सहभाग घ्यावा महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन


ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदीमध्ये वाढ करण्यात आली असून यामध्ये उद्योगधंदे प्रभावीत झाल्यामुळे अनेक कामगार विस्थापित / बेरोजगार झाले आहेत अशा बेरोजगार कामगारांचे लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेषत: परराज्यातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अशा नागरिकांची निवारा, गृह, पाणी, अन्नधान्य व भोजन व्यवस्था व वैद्यकीय देखभाल व्हावी यासाठी स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून मदतकेंद्र सुरू करण्याची कार्यवाही समाजविकासविभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याची  माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली आहे. 


लॉकडाऊनमुळे हातमजुरीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे, या नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सुविधा उपलबध होणे गरजेचे आहे, यासाठी प्रभागसमिती निहाय अशा व्यक्तींची नोंदणी करुन त्यांना निवास, पाणी, अन्नधान्य, भोजनव्यवस्था व आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा देणेबाबत कार्यवाही करावी जेणेकरुन त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागणार नाही. यासाठी  महापालिकेच्या माध्यमातून निवास केंद्राची निर्मिती करण्यात यावी असे आदेश शासनाच्या माध्यमातून देण्यात आले असून प्रभागस्तरावर महापालिकेने याची कार्यवाही तात्काळ करावी, याकामी त्या त्या विभागातील सामाजिक संस्थांचे देखील सहकार्य घ्यावे या अनुषंगाने महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सर्व प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त यांना आदेश देवून नागरिकांना येणाऱ्या अडचणी/ समस्या दूर करण्यासाठी 24x7 हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात यावी अशा सूचना आयुक्त  विजय सिंघल यांनी  दिल्या आहेत.  


महापालिकेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेवू इचिछणाऱ्या सामाजिक संस्थांनी व  नागरिकांनी महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या samajvikasmis@gmail.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे.