कुणबी सहकारी बँकेची मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखांची मदत - मुंबईच्या विविध भागात जीवनावश्यक वस्तूंचे देखील वाटप

   


मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाउन सुरू असल्याने राज्यातील सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. परिणामी अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे.  यातून मुंबईतील नोकरदार वर्गही सुटलेला नाही. त्यातच उद्योगधंदे ठप्प झाल्याने राज्याच्या महसुलात देखील मोठी घट झाल्याने अनेकजण मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हाताने मदत करीत आहेत. मुंबईतील कुणबी सहकारी बँक या बँकेने देखील ही भयानक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपये तसेच बँकेच्या सभासदांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.बँकेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल धोंडू चिविलकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी उपस्थित संचालक मंडळावरील सभासदांनी त्यांना मिळणारे वार्षिक भत्ते न घेता या भत्यांच्या रकमेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून ती मुंबईतील विविध भागात देण्याचे ठरविले. सध्या वाहतुकीची बंधने लक्षात घेता संचालक मंडळावरील सदस्य ज्या भागात राहतात त्या ठिकाणी असलेल्या सभासदांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये ११ वस्तूंचा समावेश करण्यात आल्याचे संचालक मंडळाचे सदस्य अनंत तांबे यांनी सांगितले. स्वतः तांबे यांनी राहत असलेल्या दिवा भागात देखील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.  त्यामुळे सर्वसामान्य सभासदांना दिलासा मिळाला असून त्यांनी बँकेचे आभार व्यक्त केले. 


या बँकेच्या एकूण सहा शाखा आहेत, यामध्ये वरळी, परळ, भांडुप, गिरगाव,कांदिवली आणि पुण्यात देखील एक शाखा अस्तित्वात असून जवळपास 20 हजार सभासद या बँकेचे आहेत.