पोलिसाला मारहाण करणारा "तो" पोलीस निलंबित


काळेवाडी – वाकड परिसरात एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. २७) घडली. 


याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली. त्यात एक लोहमार्ग पोलीस होता. लोहमार्ग पोलिसांनी देखील या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत मारहाण करणाऱ्या त्या पोलिसाला निलंबित केले आहे.


मतीन युनूस आत्तार (वय २८) असे निलंबित केलेल्या पोलिसाचे नाव आहे. या प्रकरणात त्याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई शंकर विश्वभर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


फिर्यादी पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. ते सोमवारी काळेवाडी परिसरात काम करीत होते. त्यावेळी आरोपी युनूस रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळले. त्यामुळे कळकुटे यांनी त्याला हटकले. यावरून आरोपीने कळकुटे यांच्याशी हुज्जत घातली. आरोपी मतीन याने काठीने तर अन्य दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली.कळकुटे यांच्या हातातील काठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिली.


याबाबत वाकड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण, आपत्ती व्यवस्थापन कायदा, कोविड 19 उपाययोजना २०२०, साथीचे रोग अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


वाकड पोलिसांनी तिन्ही आरोपींना तात्काळ अटक केली. आरोपींना मंगळवारी (दि. 28) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 


या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पुणे लोहमार्गचे पोलीस अधीक्षक दीपक साकोरे यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित केले आहे.