‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा श्री. संजीव जयस्‍वाल यांनी पदभार स्‍वीकारला


मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्तपदी श्री. संजीव जयस्‍वाल यांनी आज (दिनांक ०९ मे, २०२०) पदभार स्वीकारला. यावेळी सह आयुक्‍त (सामान्‍य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांनी महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने त्‍यांचे स्‍वागत केले. 

 

श्री. संजीव जयस्‍वाल हे भारतीय सनदी सेवेतील १९९६ च्‍या तुकडीचे अधिकारी असून त्‍यांनीही आतापर्यंत महत्‍त्‍वपूर्ण अशा विविध पदांवरचे काम पाहिले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने सहाय्यक जिल्‍हाधिकारी म्‍हणून नाशिक व तळोजा (जि.नंदुरबार) येथे काम केले आहे. त्‍यानंतर नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, मा. उप मुख्‍यमंत्री यांच्‍या कार्यालयात उप सचिव, चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त, औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त म्‍हणून श्री. जयस्‍वाल यांनी काम पाहिले आहे. त्‍यांनी विविध ठिकाणी केलेल्‍या विशेष कार्यांबद्दल त्‍यांना विविध सन्‍मान आणि पारितोषिके प्राप्‍त झाली आहेत.