पोलादपूर तालुक्यासाठी क्रीडा आणि प्रशासकीय संकूलकामी - पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्या सुचनेनुसार प्रस्ताव सादर


पोलादपूर तालुक्यासाठी क्रीडा व प्रशासकीय संकुल उभारणीसाठी आवश्यक जमिनी उपलब्ध करण्याबाबत पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि तहसिलदार दिप्ती देसाई यांना तोंडी सुचना दिल्या.                                       (छाया-शैलेश पालकर)


पोलादपूर प्रतिनिधी : तालुक्यातील विविध क्रीडा स्पर्धांसाठी सुसज्ज मैदानाची गरज आणि प्रशासनाच्या सर्व विभागांना सरकारी मालकीच्या इमारतीमध्ये आणण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी क्रीडा आणि प्रशासकीय संकूल उभारण्याकामी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना प्रशासनास केल्या. यानुसार प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली असून लवकरच भुसंपादनासह प्रत्यक्ष कृती सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


पोलादपूर तालुक्यासाठी क्रीडा आणि प्रशासकीय संकूल उभारण्याकामी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या उमरठ येथील उपस्थितीदरम्यान रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी केलेल्या मागणीनुसार पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई यांनी आवश्यक जमिनीसाठी संपादनाचा प्रस्ताव महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यामार्फत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे पाठविला असून लवकरच या प्रस्तावानुसार पोलादपूर शहराच्या हद्दीतील दि लेप्रसी मिशन हॉस्पीटल ऑफ इंडियाच्या ट्रस्टच्या ताब्यात सुमारे 9.67 हेक्टर जमीन असून 2 हेक्टर जमीन क्रीडासंकुलासाठी आणि 2 हेक्टर जमीन प्रशासकीय संकुलासाठी तसेच उर्वरित जागेवर हेलिपॅड तसेच शासकीय कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.


पोलादपूर तालुक्यासाठी 5 कोटी रुपये खर्चातून पोलादपूर तालुका क्रीडा संकूल उभे करण्यासाठी जमीन ताब्यात घेतली जात असून पोलादपूर तालुक्यासाठी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्याचा मानस असल्याचे रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्यासमक्ष उमरट येथील नरवीर तानाजी मालुसरे त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी स्मृतीदिन सोहळयाप्रसंगी जाहिर केले आहे.