कोरोना व्हायरस: मास्क कसं वापरायचं?  त्याची विल्हेवाट कशी लावायची?


भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. महाराष्ट्रातही आता मुंबई, पुणे, नागपूरसह यवतमाळ, नगरमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत असल्यामुळे राज्यात नागरिकांमध्ये सतर्कता वाढतेय.


सरकार तर आपल्या वतीने खबरदारीचे उपाय करतच आहे, म्हणजे हात स्वच्छ धुवावेत, मास्क कोणते आणि कसे वापरावे, याबाबत जनजागृतीही केली जातेय.


पण नागरिकांमध्येही अभूतपूर्व अशी सतर्कता पाहायला मिळतेय. त्यामुळे बाजारांमध्ये साबणी, सॅनिटायझरचा खप वाढलाय, सोबतच चेहऱ्यावर मास्क लावणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय.


अधिकतर मुंबई, पुणेसारख्या शहरात, जिथे कामानिमित्त लाखोच्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतात, प्रवास करतात तिथे मास्क वापरले जात आहेत. मात्र कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आता सामान्य नागरिकही घराबाहेर मास्क लावूनच पडत आहेत. त्यामुळेच मास्क तसंच सॅनिटायझर यांना जीवनावश्यक वस्तू म्हणून केंद्र सरकारने जाहीर केलं आहे.


केवळ कोरोनाची लागण झालेले रुग्ण, त्यांचे निकटवर्तीय आणि आरोग्य सेवेत असलेल्या व्यक्तींनी मास्क वापरणं बंधनकारक आहे. कारण या मास्कची योग्य वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणं गरजेचं आहे.


मास्कची विल्हेवाट कशी लावायची?
जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने मास्क कसं काढायचं आणि त्याची ते कुठे फेकायचं, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.


त्यानुसार, मास्क काढताना फक्त मागून, जे धागे कानावर किंवा मानेवर असतात, तिथेच हात लावावा. कारण मास्कच्या बाहेरच्या भागावर अनेक विषाणू असू शकतात. हे मास्क मग लगेच एखाद्या कचऱ्याच्या बंद डब्यात फेकून द्यावा, जेणेकरून त्याच्यावरील कोणतेही विषाणू पुन्हा वातावरणात येणार नाही आणि त्यानंतर लगेचच हात स्वच्छ धुवावा.


मात्र जर तुमच्या आसपास बंद डस्टबिन नसेल तर अशावेळी तुम्ही एखाद्या कागदी पिशवीत ते टाकून, व्यवस्थित बंद करून ती पिशवी मग कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ शकता, असा सल्ला डॉक्टर देतात.


मास्क कुठेही फेकून दिला तर संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यासाठी विशेष बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल सिस्टम असतात. मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी हे बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल सिस्टम केवळ खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आल्याचं असं BMCच्या डॉ. केसकर म्हणाल्या.


भारत सरकारच्या बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियमानुसार, रुग्णालय, दवाखाने, मॅटर्निटी रुग्णालय, पॅथोलॉजीकल लॅब, ब्लड बँकमध्ये वापरण्यात येणारी औषधं, इंजेक्शन्स, मास्क अशा विविध गोष्टींच्या विघटनासाठी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट केलं जातं.


या कचऱ्यासाठी सामान्य डम्पिंगच्या गाड्या वापरल्या जात नाहीत तर विशेष गाड्यांद्वारे हा कचरा हाताळला जातो, त्यासाठी अधिकृत खासगी एजंसी काम करत असतात.



या वैद्यकीय कचऱ्याचं विघटन तीन प्रकारे केलं जातं -


थर्मल ऑटोक्लेव्ह - यात तापमान वाढवून विषाणू नष्ट केले जातात
रासायनिक प्रक्रिया - यात ब्लीचिंग पावडर, एथिलीन ऑक्साईड, फॉर्मएस्डीहाईड वापरून विषाणू नष्ट केले जातात
रेडिएशन - अल्ट्रावॉयलेट किरणांद्वारे विषाणू नष्ट केले जातात
याशिवाय जो कचरा संक्रमित आहे, तो जाळला जातो, बाकी कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते.


पण मास्क उघड्यावर टाकले तर...?


सहसा आपल्याला मास्क कसे वापरावे, याविषयी सांगतलं जातंय. पण ते वापरून झाल्यावर कुठे कसं टाकायचं, हे कुणालाच ठाऊक नसल्याने धोका उलट वाढतो आहे, असं तज्ज्ञांना वाटतंय.


"एकदा घातलेला मास्क काढल्यावर तो पुन्हा लावू नये, तर मास्क सलग वापरल्यास 12 तासाहून अधिक वेळ वापरला जावू नये. पण नागरिक हे नियम काटोकरपणे पाळत नसल्यास संसर्ग अधिक होतो," असं पुण्याचे वरिष्ठ डॉक्टर अविनाश भोंडवे सांगतात.


"एखाद्या व्यक्तीने वापरलेलं मास्क उघड्यावर पडलं तर त्यापासून सहा फुटापर्यंतच्या व्यक्तींना त्यापासून विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने मास्क काळजीपूर्वकच वापरलं पाहिजे.


"त्यातही अनेकजण श्वास घेता यावा म्हणून मास्क नाकावरून काढून केवळ तोंडावर लावलं जातं. यासगळ्यामुळे आपले हात वारंवार तोंडाजवळ नेले जातात ज्यामुळे व्हायरस तोंडाजवळ जाण्याची शक्यता वाढतेय," असं ते सांगतात.



'सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात'


ही परिस्थिती पाहता मुंबईच्या लोकल रेल्वेत जिथे दररोज 60 लाखहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे तिथे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका, मग तो लोकांमध्ये असो वा मास्कद्वारे जास्त आहे.


लोक मास्क रेल्वे रुळांवर, प्लॅटफॉर्मवर किंवा सार्वजनिक कचऱ्याच्या डब्यात टाकले तरी त्याच्या जवळपास असणा-यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.


 


याचा फटका सफाई कर्मचाऱ्यांनादेखील बसण्याची शक्यता आहे. कारण वापरलेले सगळे मास्क कचऱ्यातून उचलून डम्पिंगपर्यंत पोहोचेपर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा धोका आहे.


सफाई कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे प्रतिनिधी विनोद हिवाळे सांगतात की कचऱ्यातले वापरलेले मास्क उचण्याबाबत सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भीती आहे.


"मुंबई साधारण एक लाख सफाई कर्मचारी काम करतात, यापैकी अधिकतर जणांकडे हॅड ग्लोव्ह्ज नाहीत. त्यामुळे हाताने मास्क उचलावे लागतायत. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. याप्रकरणी येत्या दोन दिवसात आम्ही मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत," असंही ते म्हणाले.