ठाणे महापालिका आणि मेडिकल असो.च्या संयुक्त उपक्रमास चांगला प्रतिसाद


जवळपास 500 पेक्षा जास्त नागरिकांनी फोनवरून घेतला डॅाक्टरांचा सल्ला


ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे शाखेच्यावतीने नागरिकांसाठी सुरू केलेल्या टेलिकन्सल्टिंगद्वारे नागरिकांना वैद्यकिय सल्ला या उपक्रमास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून जवळपास 500 पेक्षा जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. दरम्यान जास्तीत जास्त ठाणेकरांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.
कोरोनाविषयी किंवा इतर आजाराविषयी नागरिकांना शंका वाटल्यास नागरिकांसाठी दूरध्वनीवरून विविध विषयातील तज्ज्ञ डॅाक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातंर्गत शहरातील खासगी प्रतिथयश तज्ज्ञ डॅाक्टरांची यादी महापालिकेच्यावतीने प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये फॅमिली फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, युरॅालॅाजिस्ट, सोनालॅाजिस्ट, रेडिओलॅाजिस्ट, बालरोग तसेच मधुमेह तज्ज्ञ आदी 35 पेक्षा जास्त विविध तज्ज्ञ आणि प्रतिथयश डॅाक्टरांचा समावेश आहे.


या सेवेचा ठाणे शहरातील जवळपास 500 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. यातील काही नागरिकांना वॅाटस् ॲपच्या द्वारे वैद्यकिय सल्ला देण्यात आला तर ज्यां नागरिकांना काही तपासण्या करण्याची गरज होती त्यांना रूग्णालयामध्ये बोलावून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
गेल्या दोन ते तीन दिवसात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून या सर्व तज्ज्ञ डॅाक्टरांची नावे आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक महापालिकेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले असून नागरिकांना त्यांच्यांशी दूरध्वनीवरून सल्ला घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.